DIET CHART FOR 2 YEARS OLD BABY | 2 वर्षाच्या बाळासाठी आहार तक्ता/ आहार वेळापत्रक , सुरुवातीच्या काळात म्हणजेच सहा महिन्याचा असेपर्यंत बाळ संपूर्णपणे आईच्या दुधावर अवलंबून असते. सहा महिन्यानंतर द्रव स्वरूपाचा आहार देण्यास सुरुवात केली जाते. साधारण बाळ एक वर्षाचे होते तेव्हा ते द्रव आणि थोड्या प्रमाणात घनपदार्थ खाण्यास सुरुवात करते. घनपदार्थ खाण्यास सुरुवात झाल्यानंतर आपण बाळाला मोठे जे अन्न खातो ते द्यावे असे डॉक्टर सांगतात. साधारण बाळ दोन वर्षाचे होते तेव्हा बाळाने आपल्यासारखे आपण जे अन्न खातो ते स्वतःच्या हाताने खाण्याची सवय लावावी असे सांगितले जाते.
दोन वर्षाच्या बाळासाठी आहार ठरविताना आहारात घरी बनविलेल्या पौष्टिक खाद्यपदार्थांचा समावेश असणे गरजेचे असते. लहान बाळांना शक्यतो फास्ट फूड किंवा इतर स्नॅक्स या पदार्थांपासून दूर ठेवावे. जेवणाच्या वेळी शक्यतो फास्ट फूड आणि इतर नमकीन पदार्थ देणे टाळावे त्यामुळे ताटाचे जे अन्न दिले आहे ते बाळ आवडीने खाईल.
DIET CHART FOR 2 YEARS OLD BABY | 2 वर्षाच्या बाळासाठी आहार तक्ता/ आहार वेळापत्रक, या लेखात बाळासाठी आहार वेळापत्रक दिले आहे. आहाराची सुद्धा वेळ पाळणे महत्त्वाचे असते. दररोज ठरलेल्या वेळी अन्न ग्रहण केले तर बाळाला त्याच वेळेला भूक लागेल आणि बाळ दिलेले अन्न मन लावून ग्रहण करेल. त्यामुळे जेवणाच्या वेळा ठरवून त्याच वेळी जेवणाची सवय लावून घेणे गरजेचे आहे.
आजच्या या लेखात आपण दोन वर्षाच्या बाळासाठी आहारविषयक टिप्स बघणार आहोत, त्याचप्रमाणे दोन वर्षाच्या बाळासाठी आहार तक्ता बघणार, तसेच बाळासाठी कोणकोणते अन्न पदार्थ आवश्यक आहे यांची माहिती घेणार आहोत, लहान मुलांना आवडतील अशा सोप्या पाककृती आजच्या या लेखात आपण बघणार आहोत.
DIET CHART FOR 2 YEARS OLD BABY | 2 वर्षाच्या बाळासाठी आहार तक्ता/ आहार वेळापत्रक
बाळासाठी आहारविषयक टिप्स:
1) दोन वर्षाच्या बाळासाठी बनविण्यात येणारे पदार्थ खूप मसालेदार असू नये.
2) दोन वर्षाच्या बाळाला जेवण देताना प्रमाण निश्चित करू नका. एखाद्या वेळेस पदार्थ आवडला तर ते जास्त जेवू शकतात आणि एखादा पदार्थ नाही आवडला तर ते कमी जेवू शकता.
3) जेवणाच्या वेळी बाहेरील नमकीन, फरसाण, बिस्किट, कुरकुरे, वेफर्स यासारखे पदार्थ देऊ नका.
4) आज जेवणात काय पदार्थ बनवला आहे याबद्दल बाळाला सांगा असे सांगितल्यामुळे बाळाच्या मनातील उत्सुकता वाढेल आणि त्यामुळे त्याची भूक वाढेल आणि तो जेवणाचा आनंद घेऊ शकेल.
5) मुलांच्या जेवणाच्या वेळेच्या आधीच जेवण तयार करून ठेवा.
6) बाळाला जेवण जेवण्यासाठी बळजबरी करू नका.
7) जेवताना शक्यतो टीव्ही न लावता बाळाला वेगवेगळ्या गोष्टी सांगून जेवू घाला. त्यामुळे बाळाचे संपूर्ण लक्ष हे जेवणावरच असेल.
8) बाळाला जेवण जेवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अमिष दाखवू नका जसे की ( तू जेवलास तर मी तुला बाहेर फिरायला घेऊन जाईल, तू जेवलास तर मी तुला चॉकलेट घेऊन देईल.)
9) काही वेळा बाळाला एखाद्या पदार्थाची ऍलर्जी असू शकते त्यामुळे ज्या पदार्थाची ऍलर्जी आहे ते पदार्थ बाळाला देणे शक्यतो टाळा.
10) एखाद्या वेळेस बाळाला जुलाब/ अतिसाराचा त्रास होत असेल तर बाळाला खायला देणे बंद करू नका, अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन बाळाला पचतील असे द्रवपदार्थ खायला द्या.
दोन वर्षाच्या बाळासाठी अन्नपदार्थ :
1) डेअरी प्रोडक्ट/ दुग्धजन्य पदार्थ:
साधारणपणे दूध, दही, ताक, पनीर यांच्यामध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. हाडे, दात, केस मजबूत करण्यासाठी कॅल्शियम ची मदत होते. त्यामुळे बाळाला दुग्धजन्य पदार्थ गरजेचे आहे.
2) फळ आहार:
दोन वर्षाच्या बाळाला केळी, पपई, संत्री, सफरचंद यांसारखी फळे द्यावी. सीजनल फळे उपलब्ध असल्यास बाळाला द्यावे. वजन वाढीसाठी आणि बाळाच्या आरोग्याला सहन होत असेल तर दररोज एक केळ बाळाला द्यावे.
3) सरबत/ ज्यूस:
लिंबूवर्गीय जसे की लिंबू, संत्री, मोसंबी यांसारखे फळे किंवा त्यांचा ज्यूस/ सरबत बाळाला द्यावे. यामध्ये विटामिन सी मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. रक्तवाहिन्या मजबूत करण्यासाठी विटामिन सी खूप मोठ्या प्रमाणात मदत करते. या फळां बरोबरच आंबा, पालक, टोमॅटो त्यामध्ये देखील विटामिन सी असते. उपलब्धतेनुसार हे पदार्थ बाळाला द्यावे.
हे हि वाचा
६ ते १२ महिन्याच्या बाळासाठी आहार https://marathisampada.com/baby-food-recipes-in-marathi-for-6-12-month-baby/
4) मांसाहार/ मासे:
मांसाहार मध्ये मोठ्या प्रमाणात लोह आणि प्रथिने असतात. त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी चिकन किंवा मांसाहार करणे फायद्याचे ठरते. माशांमध्ये मोठ्या प्रमाणात इसेन्शिअल फॅटी ॲसिड असतात. इसेन्शिअल फॅटी ऍसिड रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मदत करतात.
5) सुकामेवा:
ड्रायफ्रूट्स किंवा सुकामेवा यामध्ये काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता, अंजीर, मनुके यांचा समावेश होतो. सुकामेवा मध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि खनिजे उपलब्ध असतात.
6) सूर्यप्रकाश:
अन्नपदार्थात बरोबर शरीराला सूर्यप्रकाश मिळणे खूप आवश्यक असते. सूर्यप्रकाशामुळे विटामिन डी मिळते. बाळाची योग्य वाढ होण्यासाठी विटामिन डी आवश्यक असते. त्यामुळे लहान बाळाला दररोज कमीत कमी अर्धा तास तरी कोवळ्या उन्हात घेऊन जावे.
दोन वर्षाच्या बाळासाठी आहार तक्ता/ आहार वेळापत्रक
सकाळचा नाष्टा (7 am to 9 am): | दुपारच्या जेवणाच्या आधी (10am to 11 am): | दुपारचे जेवण(12am to 2 pm): | संध्याकाळचा नाष्टा(4 pm to 6 pm): | रात्रीचे जेवण (8 pm to 10 pm): | |
सोमवार | पोहे/ उपमा | सिझनल फळ | भाजी ,पोळी | फळांचा ज्युस | खिचडी |
मंगळवार | इडली -चटणी | सिझनल फळ | भाजी पोळी, खिचडी | दुध | डाळ भात |
बुधवार | ओम्लेट | सिझनल फळ | मटन /चिकन पोळी /भात | दुध /सॅंडविच | सोयाबीन भात |
गुरुवार | डोसा -चटणी /धिरडे | सिझनल फळ | डाळ भात | दुध /पोळी | मिक्स वेज पराठा |
शुक्रवार | नागली/राजगिरा पेज | सिझनल फळ | चिकन/मटन /मासे | दुध /धिरडे | डाळ खिचडी |
शनिवार | शिरा /दलिया | सिझनल फळ | पातळ भाजी पोळी | फळांचा ज्युस | पुलाव /धिरडे |
रविवार | उकडलेले अंडे /ओम्लेट | सिझनल फळ | अंड्याची भाजी /पोळी | तांदळाची खीर | भात -पातळ भाजी |
दोन वर्षाच्या बाळासाठी पाककृती
१) मिक्स डाळीची खिचडी:
साहित्य:
तुरीची डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, उडीद डाळ ( प्रत्येकी एक चमचा)
तांदूळ
लसुन
हिरवी मिरची
कढीपत्ता
जिरे
हिंग
तेल/ तूप
मीठ
कृती:
१) तांदूळ व डाळ स्वच्छ धुऊन घ्यावी.
२) कुकर मध्ये फोडणीसाठी आवडीनुसार आणि गरजेनुसार तेल व तूप घ्यावे.
३) फोडणीत जिरे, कढीपत्ता, हिंग, लसुन आणि हिरवी मिरची टाकावे.
४) लसुन गुलाबी रंगाचा झाल्यानंतर त्यामध्ये तांदूळ व डाळ टाकावी आणि मिश्रण दोन ते तीन मिनिटं परतून घ्यावे.
५) डाळ व तांदूळ परतल्यानंतर त्यात गरजेनुसार पाणी टाकावे आणि त्यानंतर मीठ टाकून कुकरचे झाकण लावून 10 मिनिटं मध्यम गॅसवर खिचडी होण्यासाठी ठेवावी.
६) कुकर थंड झाल्यावर गरम गरम मिक्स डाळीची खिचडी तूप टाकून बाळाला द्यावी.
२) लापशी
साहित्य:
लापशी रवा
तुप
पाणी
ड्राय फ्रुट्स
गुळ
कृती:
लापशी शक्यतो कुकरमध्येच करावी कुकरमध्ये केल्यामुळे लापशी मऊ शिजते.
१) कुकर मध्ये गरजेनुसार तूप टाकावे त्यात लापशी रवा गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यावा.
२) गरजेनुसार गरम पाणी टाकून कुकरचे झाकण लावून 10 मिनिटं मध्यम गॅसवर रवा शिजवून घ्यावा.
३) दुसऱ्या भांड्यात थोडे गरम पाणी घेऊन त्यात गरजेनुसार गुळ विरघळून घ्यावा.
४) कुकर थंड झाल्यावर गुळाचे पाणी शिजलेल्या रव्यामध्ये घालावे.
५) मध्यम गॅसवर परत एकदा लापशी शिजवून घ्यावी.
६) गरजेनुसार पाणी कमी जास्त करावे.
७) आवडीनुसार काजू बदाम चे काप घालावे.
८) तयार झालेली लापशी बाळ आवडीने खाते.
३) शिरा:
साहित्य:
रवा
तूप
साखर
काजू बदामाचे काप
पाणी
कृती:
१) कढईत तूप घ्यावे त्यात रवा गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यावा.
२) रव्याचा खमंग वास आल्यानंतर त्यात गरजेनुसार गरम पाणी टाकावे आणि झाकण ठेवून रवा शिजवून घ्यावा.
३) रवा शिजल्यानंतर गरजेनुसार साखर टाकावी आणि काजू बदामाचे काप टाकून पुन्हा एकदा रवा मिक्स करून घ्यावा.
४) तयार झालेला शिरा बाळ आवडीने खाईल.
४) धिरडे:
साहित्य:
बेसन पीठ : २ चमचे
मुगाच्या डाळीचे पीठ: दोन चमचे
रवा: एक चमचा
कांदा
हिरवी मिरची
गाजर
टोमॅटो
कोथिंबीर
ओवा
मीठ
तेल
पाणी
कृती:
१) बेसन पीठ, मुगाच्या डाळीचे पीठ आणि रवा एकत्र करून घ्या त्यात गरजेनुसार मीठ आणि ओवा टाका. पाणी टाकून धिरडे बनविण्यासाठी मिश्रण तयार करून घ्या.
२) 15-20 मिनिटं मिश्रण तसेच झाकून ठेवा.
३) त्यानंतर मिश्रणात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, गाजर, टोमॅटो, कोथिंबीर टाका. सर्व मिश्रण एकत्रित करून त्याचे धिरडे बनवून घ्या.
४) तेल वापरू दोन्ही बाजूंनी धिरडे चांगले भाजून घ्या.
५) तयार झालेले धिरडे बाळ आवडीने खाईल.
६) टोमॅटो केचप बरोबर तुम्ही धिरडे सर्व्ह करू शकता.
५) अंडा पराठा:
साहित्य:
उकडलेले अंडे
लाल तिखट
हळद
मीठ
चाट मसाला
कोथंबीर
चीज
कणिक
तेल
कृती:
१) उकडलेले अंडे किसून घ्या त्यात आवडीनुसार लाल तिखट, हळद, मीठ, चाट मसाला ,कोथिंबीर घाला. उपलब्ध असल्यास थोडे चीज किसून घाला. हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्या.
२) साधारणपणे पोळीसाठी जितका कणकेचा गोळा घेतो तेवढा कणकेचा गोळा घ्या पुरण भरतो त्याप्रमाणे हे सर्व मिश्रण त्या गोळ्यात भरा.
३) पराठा लाटून घ्या.
४) तेलाचा वापर करून पराठा खरपूस भाजून घ्या.
५) पराठा कट करून टोमॅटो केचप सोबत सर्व्ह करा.
निष्कर्ष:
DIET CHART FOR 2 YEARS OLD BABY | 2 वर्षाच्या बाळासाठी आहार तक्ता/ आहार वेळापत्रक या लेखात आपण दोन वर्षाच्या बाळाच्या आहारात कोण कोणत्या पदार्थांचा समावेश असावा याबद्दल सविस्तर माहिती बघितली. त्याचबरोबर दोन वर्षाच्या बाळाला आवडतील आणि सहज खाता येतील अशा काही सोप्या पाककृती बघितल्या. तुम्हाला लेख कसा वाटला याबद्दल आम्हाला नक्की कळवा. आणि लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.